
पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमध्ये रस्त्याने चालण्यासाठी जागा नसताना आता दुचाकीवाले आपल्या गाड्या पदपथावर उभ्या करू लागल्याने आता चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नवीन पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन समोरील रस्त्याच्या कोणत्याही बाजूला जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड अशी परिस्थिती झाली आहे. बिकानेर कॉर्नरला सीकेटीकडे जाणारा रस्ता, एचडीफसी सर्कलकडे जाणारा, विचुंबेकडे जाणारा आणि स्टेशनकडे जाणारा रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा उभ्या केल्या जातात. याशिवाय रस्त्यावर उभ्या केलेल्या खाजगी गाड्या आणि तेथील गॅरेजसमोर गाड्या उभ्या असल्याने सकाळी आणि संध्याकाळी त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. याबाबत वाहतूक पोलीस कोणतीही ठोस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढली आहे. त्यातच अनधिकृतपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने यामुळे या रस्त्यावरून चालण्यास जागा राहिली नाही. दुचाकीवाले रस्त्यावर जागा शिल्लक नसल्याने पदपथावरच दुचाकी उभी करीत आहेत. अनेक सोसायटीवाल्यांनी आपल्या समोरील फूटपाथवर गाड्या लावू नयेत, यासाठी साखळ्या लावल्या आहेत. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक यांना चालायलाच जागा नाही. पदपथावर दुचाकी उभी करणार्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करीत आहेत.