नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ’सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ’भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करू या. ’भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता, असे आवाहन मोदींनी रविवारी ’मन की बात’मध्ये केले.
आपल्या दुसर्या कार्यकाळातील चौथ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी नशामुक्तीपासून प्लास्टिकमुक्तीपर्यंतचे आवाहन केले. देशवासीयांना दसरा, दिवाळी अशा सणावाराच्या शुभेच्छा दिल्या. ‘मन की बात’ सुरू होण्यापूर्वी एक ट्विट करीत पंतप्रधानांनी आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणा असेल, असे म्हटले होते. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता होती. हा विशेष पाहुणा म्हणजे अन्य कोणी नव्हे, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर होत्या. मोदींनी लतादीदींसोबत त्यांच्या वाढदिवशी 28 सप्टेंबर रोजी झालेले संभाषण या कार्यक्रमात ऐकवले.
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगितले की, सणावारांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहर्यावर हसू आणण्यात, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यात आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशवासीयांनी ’भारताची लक्ष्मी’ अभियान चालवावे, असे आवाहन मोदींनी केले. ’भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता, असे ते म्हणाले. सिस्टर मरियम थ्रेसिया यांच्या कामाचा उल्लेखही मोदींनी केला. ते म्हणाले की, सिस्टर थ्रेसिया यांनी 50 वर्षे मानवतेची सेवा केली. पुढील महिन्यात त्यांचा व्हॅटिकन सिटीत सन्मान होणार असून, त्यांना संत घोषित केले जाणार आहे. भारत अशा असाधारण लोकांची कर्मभूमी आहे.
ई-सिगारेट सोडा -मोदी तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचे त्यांनी आवाहन केले. अनेकदा किशोरवयीन फॅशन म्हणून मजेसाठी तंबाखू सेवन आणि स्मोकिंग सुरू करतात. मग नशेचे शिकार होतात. ई-सिगारेटही सिगारेट, तंबाखूइतकीच धोकादायक आहे, असेही ते म्हणाले.