Breaking News

समाजाला चांगल्या न्यायाधीशाची गरज

न्यायाधीश अनामिका मोताळे-पोरे यांचे मत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायिक सेवा-एक व्यावसायिक पर्याय या विषयावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी-नवी मुंबईच्या अनामिका मोताळे-पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी मोताळे-पोरे यांचे स्वागत केले. प्रस्ताविकात त्यांनी सांगितले की मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना सन 2016मध्ये त्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि अलीकडेच 2017मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी,  वाशी-नवी मुंबई येथे नेमणूक झाली आहे.

मोताळे-पोरे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी परीक्षा, त्याकरिता विद्यार्थ्यांनी करावयाची पूर्वतयारी, न्यायिक सेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी म्हणून कायदा अभ्यास करताना घ्यायची काळजी, अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. सर्वांना न्याय मिळावा, ही इच्छा प्रत्येकाची असते आणि वकिली व्यवसायाशी संबंध असणार्‍यांना कायद्यातील तरतुदी माहिती असल्यामुळे अन्यायाविरुद्धची चीड काहीशी अधिक प्रमाणात असते, परंतु न्यायाधीश म्हणून प्रत्यक्ष न्याय देण्याचे काम करताना, जे समाधान मनाला मिळते हे अतुलनीय आहे. न्यायाधीशांना मिळणारे वेतन, याबरोबरच असलेल्या सुविधा,  मिळणारा मान आणि त्यापेक्षा सुद्धा मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि समाजाला असलेली चांगल्या न्यायाधीशांची गरज, यामुळे विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच न्यायिक सेवा या पर्यायाचा व्यवसायिक पर्याय म्हणून विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी विद्यमान विद्यार्थ्यांसोबत अनेक माजी विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. त्याच सोबत सहा. शिक्षिका दीपाली बाबर, सहा. शिक्षिका प्रियांका म्हात्रे, सहा. शिक्षिका श्रुती पोटे यासुद्धा उपस्थित होत्या. या व्याख्यानानंतर मोताळे-पोरे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. सूत्रसंचालन आणि आभार सुयश बारटक्के या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply