अलिबाग : जिमाका
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकार्यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात कलम 144नुसार मनाई आदेश जारी केला आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात येणार असून गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणी कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावे आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजाविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेऊन फिरण्यास, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाइल, पेजर अथवा कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्य करण्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकार्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144नुसार मनाई आदेश जारी केला आहे. हा मनाई आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील कर्जत, उरण (जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रापुरता), पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत अमलात राहील, असे जिल्हा दंडाधिकार्यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे कळविले आहे.