जेएनपीटी : प्रतिनिधी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना चिरनेर तिरंगा पतपेढी, नागरिक आणि तरुणांनी त्यांच्या घरी जाऊन एक लाखाची आर्थिक मदत केली आहे. चिरनेर भोमच्या माध्यमातून यावर्षीही नुकतेच तिरंगा चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजकांच्या वतीने पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी जमा होणार्या रकमेइतकी रक्कम स्वतः आयोजक शहीद जवानांच्या वारसांपर्यंत पोहचवतील, असे जाहीर केले. या आवाहनास देशप्रेमी खेळाडू आणि क्रिकेट रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता पहिल्या दिवशी अवघ्या पाच मिनिटांत तब्बल 27,084 रु. जमा झाले. त्यानंतर दुसर्याही दिवशी 16,620 रु. इतकी रक्कम जमा झाली. समालोचन करणार्या सुनील वर्तक (गोवठणे) यांनी त्यांना मिळणार्या मानधनाची एक हजार रुपयांची रक्कम आणि गुणलेखक सचिन केणी (चिरनेर) यांनी आपल्या मानधनाची चार हजारांची रक्कम याच निधीत जमा केली. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ नवजीवन मुलेखंड यांच्याकडून 10 हजार रुपये तसेच चतुर्थ क्रमांक विजेते विनोद स्पोर्ट्स, रोहिंजन यांच्याकडून चार हजारांची रक्कम व चिरनेरमधील तिरंगा पतपेढीच्या संचालक आणि कर्मचार्यांकडूनही 10 हजार रुपये निधीत जमा करण्यात आले. ही आर्थिक मदत शहीद नितीन राठोड (बुलडाणा) व शहीद संजय राजपूत (सांगली) यांच्या वारसांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन तिरंगा चषक स्पर्धेचे आयोजक अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, महेंद्र ठाकूर, सचिन घबाडी, रवींद्र भगत, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, राजेंद्र भगत, गणेश म्हात्रे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने देशप्रेम आणि शहीद जवानांप्रति असलेल्या प्रेमाबद्दल दिली.