Breaking News

जेबीएसपी गुणवत्तेने मोठी झालेली संस्था : दिनकर पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिक्षणाप्रति सामाजिक जाणीव आणि तळमळ असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्ता व कार्याने मोठी झाली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी शनिवारी (दि. 13) नवीन पनवेल येथे काढले.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी)वतीने पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव समारंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या वेळी विशेष अतिथी म्हणून पाटील बोलत होते.  

शिक्षण माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यातूनच आयुष्य घडत असते. जेथे शिक्षण तेथे विकास हा पायंडा आहे, असे सांगून दिनकर पाटील म्हणाले की, विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिल्यामुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था मोठी झाली. शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा येथे असून, गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याचे काम संस्था करीत आहे. अनेक संस्था व्यावसायिक स्वरूपाने शिक्षण देत आहेत, मात्र त्याला अपवाद म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था सामाजिक जाणिवेतून काम करीत आहे. शिक्षक दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. त्या अनुषंगाने संस्था तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबरोबरच बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे काम करीत आहे.

संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, येथे चांगले शिक्षण मिळत आहे हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांच्या यशामधून आम्हाला समाधान मिळते. संख्यावाढीबरोबरच गुणवत्ताही वाढत आहे याचा अभिमान आहे. सर्वसामान्यांना परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आम्ही यापुढेही करीत राहू.

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बरोबरीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नाव मोठे होत असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शाळांच्या संख्येवर नाही; तर गुणांवर विश्वास आहे. म्हणूनच ही संस्था यशस्वी वाटचाल करू शकली आहे. 25 वर्षे संस्थेला पूर्ण झाली असताना आजवर यशाचे अनेक टप्पे पार केले. व्यवसाय म्हणून नव्हे; तर विद्यार्थ्यांचा विकास आणि सक्षम पिढी घडविण्याचा दृष्टिकोन ठेवून संस्था काम करीत आहे. 

प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव व विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी केले. या वेळी थ्रीडी थिएटर, कॉम्प्युटर लॅब आणि प्ले ग्राऊंडचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सीकेटी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, शिक्षण विभागाचे साहिल वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, भाजपचे राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, संतोष भोईर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य शितला गावंड, श्री. बावडे, जयराम मुंबईकर, कामोठे विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे आदी उपस्थित होते.

‘शिक्षणाबरोबरच कलागुणांना वाव’

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, संस्था शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहे. त्यामुळे ही संस्था अल्पावधीतच यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करू शकली आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतकांचे श्रेय असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply