पनवेल : रामप्रहर वृत्त
वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पनवेल-उरण रोडवर गाढी नदीवरील वडघर येथील दुसर्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 ऑगस्ट 2016 रोजी अतिवष्टीमुळे महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला आणि अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून धोकादायक पुलावरील वाहतूक बंद किंवा कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यात पनवेल-उरण मार्गावर असणार्या गाढी नदीवरील वडघर येथील पुलाचासुद्धा समावेश होता आणि या पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करून फक्त एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा पूल असलेल्या पनवेल शहरातील उरण नाका ते करंजाडे गावापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने दुसर्या बाजूच्या या पुलाचे काम लवकरात लवकर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पनवेल-उरण मार्गावरील गाढी नदीवरील वडघर पुलाचे काम लवकर लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केली आहे.