कर्जत : प्रतिनिधी
कर्जत नगर परिषदची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
नगर परिषद सभागृहात झालेल्या या सभेस नगरसेवक शरद लाड, राहुल डाळींबकर, विवेक दांडेकर, नितीन सावंत, बळवंत घुमरे, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, धनंजय दुर्गे, संकेत भासे, नगरसेविका ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.
सभेत राहुल डाळींबकर यांनी कचरा संकलनावर कामगार वाढविण्याची मागणी केली. या मागणीला शरद लाड यांनी दुजोरा दिला. यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कर्मचारी वाढविले असल्याची माहिती दिली. नितीन सावंत यांनी या कामगारांचा विमा काढला आहेत की नाही याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी सूचना केली.
बळवंत घुमरे यांनी शहरातील अनेक इमारतीचे पार्किंग बिल्डरने हडप केले आहे, इमारतींना अनेक वर्षे उलटून गेली आहेत तरी पार्किंग ठेकेदारांच्या ताब्यात आहेत त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे, तर काही रस्त्यावर जुन्या गाड्या वर्षोनुवर्षे त्याच ठिकाणी उभ्या आहेत यावर नगर परिषद प्रशासन कधी कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला. घरपट्टीची चुकीच्या पध्द्तीने आकारणी केली असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे निदर्शनास आणून दिले. यावर त्याचे दर टाऊनप्लानिंग मंजूर केले आहेत, याबाबत पुढील दरवाढीच्या वेळीस विचार करता येईल असे मुख्याधिकारी कोकरे यांनी स्पष्ट केले. सोमनाथ ठोंबरे, उमेश गायकवाड, मधुरा चंदन, संकेत भासे, वैशाली मोरे यांनीही काही प्रश्न मांडले. विषय पत्रिकेवर ठेवण्यात आलेल्या विकास कामांना या सभेत मंजुरी देण्यात आली.