अलिबाग : जिमाका
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम परिवर्तकांनी विविध कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 19) येथ केले.
जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियनांतर्गत रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा बैठक अलिबाग येथील नियोजन भवन येथे मंगळवारी घेण्यात आली. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, शाळा दुरुस्ती, शाळा डिजिटल करणे, शौचालय बांधकाम दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कुकट पालन, मस्त्य पालन, शेळी पालन, शेततळे आदि विविध क्षेत्रात या अभियानांतर्गत कामे सुरु आहेत. मात्र अद्यापही काही कामे प्रलंबित आहेत. ती संबंधित विभागाचे अधिकारी व ग्राम परिवर्तक यांनी समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच पुढील वर्षी करावयाच्या कामांचा आराखडा लवकर सादर करण्याचे निर्देशही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
रायगड जिपचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे, गटविकास अधिकारी, 22 ग्रामपंचायतींमधील ग्रामपरिवर्तक व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.