Breaking News

वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना पुरेसे निवृत्तीवेतन

जिल्हाधिकार्‍यांकडून तातडीने दखल

अलिबाग : जिमाका : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तहसीलदार आयरे यांना, लक्ष्मीबाईंशी प्रत्यक्ष भेटून त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत, याविषयी विचारणा करण्यास सांगितले होते. वीरपत्नी लक्ष्मीबाई या 100 वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. लक्ष्मीबाई यांना स्मृतिभ्रंशाचा आजार असून सध्याचे उपचार पुरेसे आणि योग्य आहेत, असे त्यांचा सांभाळ करणार्‍या नातेवाईकांनी सांगितले.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना 13 हजार 250 निवृत्तीवेतन आणि मुख्यमंत्री निधीतून तितकेच म्हणजे 13 हजार 250 असे एकूण 26 हजार 250 रुपये मासिक वेतन मिळते, यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माणगावातील  शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांचे स्मारकदेखील सुस्थितीत आहे, या ठिकाणी त्यांचा जन्मोत्सवदेखील व्यवस्थित पार पडतो, अशी माहिती तहसीलदार आयरे यांनी या वेळी दिली. वीर घाडगे यांचा विवाह 1937 मध्ये झाला होता, मात्र त्यानंतर महायुद्धाचे वारे वाहू लागल्यावर ते इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी कुटुंबाची पर्वा न करता मराठा लाईट इन्फंट्रीत रुजू झाले. 10 जुलै 1944 मध्ये समोरच्या जर्मन सैन्यावर आपल्या तुकडीसमवेत चाल करून गेले असता त्यांना वीरमरण आले होते. शरीराची चाळण झाली असतानादेखील शत्रूवर सतत गोळीबार करून त्यांनी आपल्या सैन्याचा मार्ग मोकळा केला होता. 3 मार्च 1945 रोजी लाल किल्ला येथे यशवंतरावांची पत्नी लक्ष्मीबाई यांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आला होता.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply