Breaking News

स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा होऊ नये

गेल्या वर्षी पोलादपूर तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नावाजलेल्या व्यक्तीमत्वाचे दीर्घ आजाराने निधन होऊन एक वर्ष होत आले. जगन्नाथ दाजी जाधव यांची स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोलादपूर अथवा रायगड जिल्ह्यामध्ये बर्‍याच नागरिकांना ओळख नव्हती, मात्र त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत अनेक वृत्तपत्रांतून सविस्तर माहिती प्रसिध्द होऊनही तत्कालीन प्रशासन अनभिज्ञ राहिले. स्वात्रंत्र्यसैनिकांबाबत पुन्हा असा हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्याच्या गावांत वाई गंगापूरी भागातून भटक्या समाजाचे काही लोक इंग्रजांनी बांधलेल्या ’फिटझगेराल्ड’म्हणजे आंबेनळी घाटातून व्यापारासाठी येत असत. साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरूवातीस दाजी आणि सिधू असे दोघे भाऊ ऍल्युमिनियमची भांडी, मोती, मणिपोत, बांगड्या असा कटलरीचा व्यापार करण्यासाठी वडील काळूराम जवारी यांच्यासोबत आले. सिधू दारूच्या व्यसनामुळे काही काळ परांगदा झाला तर मोठा दाजी पोलादपूरमध्ये स्थिरावला. दाजी जवारी यांना दोन पत्नींपासून आठ अपत्यं होती. त्यापैकी जगन्नाथ हे तिसरे पुत्र होत. त्यांचे जवारी हे आडनांव दुसर्‍या पिढीत गोसावी तर सध्याच्या पिढीत जाधव असे परिचित झाले आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 1945 साली ते सिंधूदूर्ग कणकवलीतील गोपूरी येथे आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे काही काळ वास्तव्यास होते. तेथे आप्पासाहेबांनी त्यांचा परिचय गोविंद पवार, तडलगी यांच्यासमवेत करून जगन्नाथ जाधव यांना निझामाने देश स्वतंत्र होऊनही हैद्राबाद संस्थान विलीन करण्यास विलंब चालविल्याबद्दल माहिती दिली. जळकोट येथील कृष्णकांत चौधरी आणि उमरगा येथील अप्पासाहेब पाटील यांच्यासमवेत हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभागी होण्यासंदर्भात आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलली सूचना जगन्नाथ दा.जाधव यांना मनापासून पटली. यामुळे त्यांनी हैद्रबाद मुक्ती संग्रामामध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन भूमिगत होत तेथील पोलीस चौकी उद्ध्वस्त करणे, महत्वाचे संदेश व कागदपत्रे यांची ने-आण करणे, सिंधी झाडे तोडणे, भूमिगतांना जेवणाची शिदोरी पोहोचविणे, अशी विविध कामे केली. यामागे प्रेरणास्त्रोत असलेले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले आवाहन जगन्नाथ जाधव यांच्या आजही स्मरणात आहे. 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद मुक्ती संग्राम ऐन संघर्षाच्या पावित्र्यात आला असताना जगन्नाथ जाधव यांनी सातत्याने सर्व भूमिगतांना सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या नावाचे वॉरण्ट निघाले. मात्र, ते चलाखीने भूमिगत राहिल्याने पोलीसांच्या हाती कधीही लागले नाहीत.13 सप्टेंबर 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थान खालसा करून तेथे तिरंगा फडकाविण्याचा हूकूम जारी केला आणि सर्व भूमिगत नेते-कार्यकर्ते कार्यपूर्तीमुळे हजर झाले. हैद्राबादच्या जेलरने जगन्नाथ दा. जाधव यांना वॉरण्ट सर्टिफिकेट सोपविले. या देशसेवेमुळे हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. जगन्नाथ दा. जाधव यानंतर परत जन्मगावी पोलादपूर येथे आले. परंतू, त्यांना कुटूंबियांनी परत मुंबईला धाडले. तेथे दादर भातबाजारातील व्यापारी देवशी चणा यांच्या दुकानात व घरी चाकरी केली. त्यानंतर मशीद बंदरच्या मेवा व्यापारी रघुनाथ देवजीकडे नोकरी पत्करली. येथे जगन्नाथ दा.जाधव यांनी गुजराथी भाषा अवगत केली. पिंगेज क्लासेसमध्ये शिकून रात्रशाहेत नांव टाकले. मॅट्रीकपर्यंत शिकून जयहिंद सिनेमाजवळ शिकवणी वर्ग सुरू केले. मास्तर अशी ओळख निर्माण झाली. याकाळात नाथ जोगी समाजातील असंख्य लोकांशी संपर्क वाढला आणि परंलच्या कामगार मैदानात समाजाची 1960 साली सभा झाली. यात सिंधुदूर्गचे विश्वनाथ हटकर यांनी जगन्नाथ दा. जाधव यांचे अध्यक्ष पदासाठी नांव सुचविले तर विश्वनाथ भाऊ तपकिरे यांनी अनुमोदन दिले. यांनतर महाराष्ट्रातील नाथजोगी समाजामध्ये ऐक्याची भावना निर्माण करून समाज मंडळांची ठिककिाणी तालुका व जिल्हावार रचना करण्याकामी जगन्नाथ दा. जाधव यांनी प्रवृत्त केले.  याकाळात खादी बोर्डाचे अध्यक्ष वैकुंठलाल मेहता, यू.एन.ढेबर, सी. रामचंद्रन, पुरूषोत्तम कानजी यांनी जगन्नाळा दा.जाधव यांची देशसेवा विचारात घेऊन 1956 मध्ये टेक्नीकल चेकर पदावर सेवेत घेतले. यामुळे नोकरी सांभाळून समाजसेवेचे व्रत सुरू ठेवावे लागले. यादरम्रुान 1959 मध्ये वडील दाजी व आई कृष्णामाई यांनी जगन्नाथांचा विवाह शकुंतला हिच्यासमवेत करून दिला. विवाहानंतर पत्नीने लालबाग येथे दुकान सुरू केले आणि नोकरी सांभाळून जगन्नाथ जाधव समाजाची सभासाद नोंदणी करण्यास वेळ देऊ लागले.सर्व समाजधुरिणांसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात फिरून नाथ संप्रदाय, नवनाथ संप्रदाय, नाथ जागी, फासेपारधी अशा सर्व भटक्या समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू केले. हरिजन, गिरीजन, कातकरी, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी, जवारी, डौरी, बाबा, बेलदार आणि सर्व भटका समाज एकत्र करण्यात काहिसे यश आल्यानंतर दिल्ली येथे अखिल भारतीय मागास परिषदेचे अध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेस जगन्नाथ दा. जाधव यांनी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून पाठविण्यात आले. तेथे त्यांनी भाषणातून पोटासाठी सवत्र संचार करणार्‍या समाजाची दखल घेऊन त्यांची शेडयुल ट्राईब्ज अनुसुचित जाती जमातीमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी करण्यास काकासाहेब कालेलकर यांच्या समोर केली. त्यानुसार कालेलकर यांनी केंद्रीय समाजकल्याणमंत्री सीताराम केसरी यांच्यासमोर तशी शिफारस केली. येथून या भटक्या विमुक्त समाजाला उत्कर्षाची संधी प्रात झाली. जगन्नाथ जाधव यांना त्यांच्या देशसेवेबद्दल स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार तर सामाजिक कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांनी जस्टीस ऑफ पीस (जेपी) पदवी देऊन सन्मानित केले. यानंतर जगन्नाथ दा. जाधव हे काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी थोर समाजसेविका डॉ. उषा मेहता यांचे सचिव म्हणून जबाबदारी स्विकारली. त्यांच्या अखेरपर्यंत सोबत करताना शिक्षण, समाजजागृती, बालवाड्या, स्त्रीमुक्ती चळवळ, व्यसनमुक्ती, अपंग संस्था, महिला संस्था, अनाथ संस्थांसाठी महत्वपूर्ण योगदानही दिले. महाराष्ट्राबाहेर हैदराबादपर्यंत देशसेवा केल्यानंतर समाजसेवेचे व्रतही दिल्ली, मेरठ,मडगांव-गोवा येथेवर पोहोचविले. याकाळात महाराष्ट्र राज्य हरिजन वेल्फेअर ऍडव्हायजरी बोर्ड सल्लागार सदस्य, नेताजा सुभाषचंद्र बोस पुरस्कार- उत्तरप्रदेश मेरठ, बृहन्मुंबईमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकारी, आझादी एक्सप्रेस रेल पुरस्कार, विजिलन्स कमिटी मुंबई सदस्य, महाराष्ट्र राज्य प्रांतिक काँग्रेस कमिटी जनरल सेक्रटरी अशी अनेक पदे भूषविली. डॉ. उषा मेहता यांच्यासमवेत राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात येण्याची संधी त्यांना लाभली. मुंबई येथून गेल्या काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ दा. जाधव पोलादपूर येथील छोटयाशा घरात त्यांच्या पत्नींसमवेत वास्तव्यास आहेत. त्यांच्या या अफाट देशसेवेची आणि विशाल समाजसेवेची पोलादपूर तालुक्याला अथवा रायगड जिल्ह्याला माहिती नाही. कुलाबा येथील मिलीटरी हॉस्पीटलमध्ये 3 मे 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री पोलादपूर येथे त्यांच्या जन्मगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये त्यांची स्वातंत्र्यसैनिक अशी नोंद नसल्याने प्रशासनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

-शैलेश पालकर

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply