उरण : वार्ताहर
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे रानसई आदिवासी भगिनी व बालगोपाळांसोबत रक्षाबंधन साजारा करण्यात आला. रानसई येथील खोंड्याची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन हा सण संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
आदिवासी माय-भगिनींना या सणाचा आनंद घेताना आपल्या भावाला किंवा मुलांना आकर्षक राख्या खरेदी करण्याची इच्छा असते, परंतु पैशांअभावी त्यांना आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. त्यांच्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी बालगोपाळांकरिता आकर्षक राख्या व चॉकलेट आणि बिस्किटे वाटप करण्यात आले.
त्या आकर्षक राख्या वाडीवरील चिमुकल्या भावांच्या हाताला बांधत बहिणींनी रक्षाबंधन सण साजरा केला.
सोबतच वाडीवरील माय-भगिनींनी राजू मुंबईकर व त्यांच्या सहकार्यांना राख्या बांधल्या. या वेळी सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, कांतीलाल म्हात्रे, गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनीत पाटील, अनिल घरत आणि रानसई आदिवासी वाडीवरील सर्व आदिवासी बांधव, माय-भगिनी, बालगोपाळ उपस्थित होते.