पनवेल : वार्ताहर
प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड, लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहेत. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात त्याचे अॅम्बेसिडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कर्नाटकातील बेंगळुरू येथे हाय राईस अॅवॉर्ड 2019ने या फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले आहे.
महिला मासिक पाळीच्या काळात वापरत असलेले पॅड सवयीप्रमाणे वर्तमानपत्रात, कागदात किंवा प्लॅस्टिक पिशवीत टाकून त्यानंतर कचर्यात टाकून देत असतात. त्यामुळे कचरा हाताळणार्यांना अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. प्रोजेक्ट रेट डॉटच्या पिशवीच्या वर्तुळामुळे अशिक्षित किंवा अर्ध साक्षर कामगारांना ते कचर्यात सहज ओळखता येतात, तसेच काही महिला हे वापरलेले पॅड टॉयलेटमध्ये फ्लश करतात. त्यामुळे गटारेसुद्धा तुंबतात आणि काही पॅडस् समुद्राला मिसळतात. त्यामुळे जैविक बाधा सुद्धा निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी प्रोजेक्ट रेड डॉट विशेष मेहनत घेत असून, या त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे व त्यांना या उपक्रमाबद्दल नुकतेच विशेष हाय राईस अॅवॉर्ड 2019ने गौरविण्यात आले आहे.