‘त्या’ वाहनांमुळे जनता अंधारात
कर्जत : बातमीदार
मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले लोखंडी कर्जत तालुक्यातील रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. खासगी वाहनांमधून नेल्या जाणार्या या अजस्त्र बॉयलरसाठी डिकसळनंतर नेरळमध्येदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नेरळ परिसरातील नागरिक हैराण झाले होते.
मुरबाड येथून निघालेल्या या लोखंडी बॉयलरचा प्रवास गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असून, हे बॉयलर घेवून निघालेली वाहने सध्या कर्जत तालुका हद्दीतून पुढे जात आहेत. सध्या तीन ट्रक कडाव येथे उभे करून ठेवण्यात आले असून सात ट्रक नेरळ गावाच्या पुढे उभे आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते ट्रक कर्जतजवळ किरवली येथे उभे करून ठेवण्यात आले होते, त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या वरून जाणार्या वीज वाहिन्या या 25 फूट उंचीच्या अजस्त्र ट्रकना पुढे जाण्यात अडथळा ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक ठेकेदाराने स्थानिक पातळीवर महावितरण कंपनीला जवळ करून आपला प्रवास सुरु ठेवला आहे. महावितरण कंपनी रात्रीच्या वेळी कोणालाही माहिती न देता वीज पुरवठा बंद करीत आहे. कर्जत तालुक्यात मागील महिन्यापासून रात्री बाराच्या ठोक्याला वीज पुरवठा खंडित केला जातो आणि पहाटे तीननंतर पुन्हा सुरू होतो. महावितरणच्या या रात्री सुरू असलेल्या कारनाम्यामुळे कर्जतची जनता संतापली आहे. मात्र महावितरणला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.
कर्जत तालुक्यातील माणगाव तेथे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले सात ट्रक पुढे शेलूकडे नेण्यासाठी गुरुवारी (दि. 5) मध्यरात्रीनंतर वीज गायब करण्यात आली होती. मात्र त्याची माहिती महावितरणने ग्राहकांना दिली नव्हती. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून महावितरण कंपनीला जाब विचारला जाणार आहे. दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ मोहाचीवाडी येथील रहिवासी मध्यरात्री बारा वाजता कॅडल मार्च काढतात, आणि तो कँडल मार्च सुरू असताना रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने नेरळमधील आंबेडकरप्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत.
सामान्य वीज ग्राहकाने आपल्या शेत जमिनीतील विजेचे खांब हलविण्यासाठी वर्षभर अर्ज विनंत्या करूनदेखील काम होत नाही. मात्र खासगी वाहतूक करणार्या ट्रकच्या आड येणार्या विजेच्या तारा रात्रीत बाजूला केल्या जातात, हे काय गौडबंगाल आहे, याचे उत्तर महावितरणने द्यावे.
-गोरख शेप, कार्यकर्ते, मानवाधिकार संघटना, कर्जत
त्या ट्रकवर असलेले लोखंडी साहित्य नेण्याची परवानगी रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आम्ही परवानगी देण्याचा प्रश्न नसून रात्रीच्या वेळी वाहतूक होत असताना कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावर बंदोबस्त देत होतो.
-अविनाश पाटील, सहाय्यक निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे
कर्जत तालुक्यातून ते ट्रक रस्ता मार्गाने नेण्यासाठी संबंधित कंपनीकडून 34 लाख रुपये महावितरण कंपनीकडे होणार्या नुकसान भरपाईच्या रुपात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे वीज पुरवठा खंडित करून वीज वाहिन्या तोडून रस्ता मोकळा करतो आणि पुन्हा त्या जोडून वीज पुरवठा सुरळीत करतो.
-आनंद घुले, सहाय्यक अभियंता, महावितरण, कर्जत