Breaking News

करंजा टर्मिनलचे उद्घाटन; किनारपट्टीवरील बंदराचे वेगाने अत्याधुनीकरण : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी

सागरमाला योजनेंतर्गत राज्य सरकारला केंद्राने भरीव आर्थिक निधी दिला असून, त्यातून किनारपट्टीवरील बंदराचे, रस्त्यांचे वेगाने अत्याधुनिकरण होत आहे. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शुक्रवारी (दि. 8) सह्याद्री अतिथीगृह येथे करंजा बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योग वाढीसाठी बंदरांचा विकास महत्त्वाचा ठरतो. राज्याला लाभलेल्या किनारपट्टीवरील मोडकळीस आलेल्या अनेक बंदराचा विकास केलेला असून, काही ठिकाणी नवीन बंदरे, जेटी उभारण्यात येत आहेत. बंदराला जोडणारे चांगले रस्ते निर्माण केले आहेत. सागरी मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाशी आणि रेल्वे जाळ्यांशी जोडला गेल्याने दळणवळण जलदगतीने सुरू झाले आहे. चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानेच जगभरातील उद्योजक राज्यात येऊन गुंतवणूक करीत आहेत. जेएनपीटी हे भारतातील मोठे बंदर असून, राज्यातील मालाची आयात-निर्यात येथून मोठ्या प्रमाणात होते. या बंदराच्या जवळच असलेल्या कारंजा बंदरामुळे येथील व्यापार-उद्योग अधिक गतिमान होईल. अतिशय कमी कालावधीत उभारलेले हे भारतातील खासगी असे अत्याधुनिक बंदर आहे. या बंदराचा उपयोग परिसरातील उद्योग वाढीसाठी होईल. देश-विदेशातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापार्‍यांना या बंदराचा चांगला उपयोग होईल. देशातील बंदराचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सागरमाला प्रकल्पांतर्गत अनेक राज्यांना निधी दिल्याने अनेक बंदरे, सागरीमार्गाचा विकास झाला आहे. पदुम मंत्री महादेव जानकर म्हणाले, सागरमाला योजनेंतर्गत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बंदराचा विकास होत आहे. किनारपट्टी भागात चांगले अंतर्गत रस्ते तयार केले आहेत. बंदरांच्या आणि जेटीच्या आधुनिकीकरणाबरोबरच मच्छीमार बांधवांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्यात आले आहे. करंजा बंदरामुळे उद्योग, व्यापार अधिक वृद्धिंगत होईल. प्रारंभी करंजा टर्मिनलचे मुख्याधिकारी निखील गांधी यांनी प्रास्ताविकातून बंदराची माहिती दिली. परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी या नव्या बंदराच्या उभारणीबाबत माहिती दिली. या समारंभास बंदरे विकास राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, पदुम व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply