महाडमध्ये मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री; परिवहन विभाग कारवाईच्या पवित्र्यात

महाड : महेश शिंदे
महाडमध्ये प्रतिमहिना सुमारे 600 मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री होत आहे. या प्रकरणी रायगड परिवहन विभागाने महाडमधील सहा मोटरसायकल विक्रेत्यांच्या शोरूमवर धाडी टाकून त्यांना मेमो दिले आहेत. सदर प्रकरणी मेनडिलर्स अर्थात परवानाधारक विक्रेत्यावर कारवाई होणार असल्याची माहिती परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.
मे. राज मोटर्स हे महाडमधील अधिकृत मोटरसायकल विक्रेते डिलर्स असून, बेकायदेशीर विक्री करणारे सुमारे 22 सबडिलर्स आहेत. या सर्वांची मिळून महिन्याकाठी जवळपास 600 मोटरसायकलींची विक्री होते, तर दिवाळी, दसरा आणि पाडव्याला ही विक्री चौपट होते. सदर व्यवसायात प्रचंड आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पाच ते सहा डिलर्सकडून हे सबडिलर्स मोटरसायकल विक्रीसाठी आणतात, मात्र मुख्य डिलर्सप्रमाणे या सबडिलर्सकडे ट्रेड सर्टीफिकेट अर्थात मोटर वाहन विक्रीचा परवाना नसतो. त्यामुळे या डिलर्सकडून ज्या मोटरसायकलची विक्री होत आहे ती बेकायदेशीर आहे. सदर ट्रेड सर्टीफिकेट हे उत्पादकाकडून दिले जाते. तालुक्यातील सर्व डिलर्सना हे ट्रेड सर्टीफिकेट मिळविणे शक्य नसते. त्यामुळे मुख्य डिलर्सच्या सर्टीफिकेटवरच हे स्थानिक डिलर्स वाहन विक्री करतात. डिस्प्लेला मोटरसायकल ठेवणे आणि अशा पध्दतीने विक्री करणे हे बेकायदेशीर आहे. याच नियमाच्या आधारे रायगडच्या परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी महाडसह जिल्ह्यातील मोटरसायकल विक्री करणार्या सबडिलर्सच्या शोरूम आणि दुकानांवर धाडी टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा सबडिलर्सना मेमो देण्यात आला आहे. सदर बेकायदेशीर सबडिलर्सकडून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकारही पुढे आले आहेत. एकाच मुख्य डिलर्सशी करार नसल्यामुळे हे सबडिलर्स मॅन्युफॅक्चर डेट संपलेल्या मोटरसायकलची विक्रीदेखील करतात. अशा प्रकारच्या मोटरसायकली डिलर्सकडून कमी किमतीत सबडिलर्सला मिळतात, तसेच फायनान्स कंपनीकडून प्रत्येक मोटरसायकलमागे दोन ते तीन हजार रुपये या सबडिलर्सना मिळतात. तसेच विमा कंपन्यांकडूनही कमिशन मिळते. सुटे भाग, ऑइल, लेबर या नावाखाली ग्राहकांची लूट करून हे सबडिलर्स मजबूत नफा कमवत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर वाहन विक्री व्यवसायाला ऊत आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper