पनवेल : बातमीदार
पनवेल बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक आणि वकील मनोज भुजबळ यांनी बाजी मारत दुसर्यांदा अध्यक्षपदावर बसण्याचा मान मिळविला. उपाध्यक्ष संदीप जगे यांना मनोज भुजबळ यांनी पराभूत केले. पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. पनवेल बार असोसिएशनची निवडणूक यापूर्वी कधी नव्हे ती पहिल्यांदाच चर्चेत आली. पनवेल महापालिकेत भाजपचे नगरसेवक असलेले अॅड. मनोज भुजबळ अध्यक्षपदावर होते. यंदा पुन्हा त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मागील वेळी एकत्र लढलेले उपाध्यक्ष संदीप जगे आणि मनोज भुजबळ यांनी या वेळी अध्यक्षपदासाठी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीचा यशस्वी प्रचार पाठीशी असल्यामुळे भुजबळ यांनी सर्व बळाचा वापर करीत निवडणुकीत हायटेक प्रचार केला. नव्याने सदस्य नोंदणी असेल, प्रचारात समाजमाध्यमाचा वापर, मतदान करण्यासाठी रेकॉर्डिंग कॉल, व्हिडीओ, लघुसंदेश, नव्या आणि ज्येष्ठ वकिलांच्या मुलाखती असा प्रचार
त्यांनी केला.
पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीत अशा पद्धतीने प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. असोसिएशनचे माजी अध्यक्ष मदन गोवारी यांनीदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. अचानक अर्ज माघारी घेऊन त्यांनी संदीप जगे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत आली.
760 सदस्य असलेल्या असोसिएशनच्या सदस्यांसाठी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. शनिवारी रात्री उशिरा मतमोजणी होऊन रात्री 12 वाजता निकालदेखील जाहीर झाले. मनोज भुजबळ अध्यक्षपदी, तर सचिवपदी पुन्हा एकदा प्रल्हाद खोपकर यांची निवड झाली. सहसचिव अस्मिता भुवड, उपाध्यक्ष जे. डी. पाटील, खजिनदार सचिन म्हात्रे, सहखजिनदार सुशांत घरत, पुरुष सदस्य विशाल डोंगरे, अविनाश भोईर, महिला सदस्य हेमा भगत, सीमा भोईर अशी या नवनियुक्त पदाधिकार्यांची नावे आहेत.