मुरूड : प्रतिनिधी
विहूर येथील मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच नवाबकालीन गारंबी धरण परिसरात साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. हे शिबिर विद्यार्थ्यांना भावी जीवनात खूप मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महेश पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
राष्ट्रगीताने या शिबिराची सुरुवात झाली. या एकदिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, रिवर क्रॉसिंग, रायफल शूटिंग अशा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच गायन, काव्यवाचन, वक्तृत्व असे कार्यक्रम घेण्यात आले. शिक्षक गजानन घाग यांनी विद्यार्थ्यांना जंगलातील झाडांबद्दल थोडक्यात माहिती दिली.
गारंबी धरणामधून मुरूड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या गोळा केल्या. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
शिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले साहसी शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मतीन हमदुले, तन्नू ददनाक, आयशा टिचर तसेच फरहान दामाद यांनी विशेष परिश्रम घेतले.