अलिबाग : प्रतिनिधी
बनावट नोटा छापणार्या दोन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख 14 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा, तसेच स्कॅनर प्रिंटर जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना अलिबाग शहरातील मेघा टॉकिज परिसरात काही इसम भारतीय चलनातील बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार 27 डिसेंबरला सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींजवळ दोन हजार, पाचशे, दोनशे रुपये दराच्या एक लाख 14 हजार 600 रुपये बनावट नोटा आढळल्या. या नोटा ते स्वतः छपाई करीत असल्याचे उघड झाल्याने त्यासाठी वापरण्यात आलेले स्कॅनर प्रिंटर पनवेल येथून हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शेख, उपनिरीक्षक एस. बी. निकाळजे, हवालदार कराळे, पाटील, दबडे यांनी ही कारवाई केली.