खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
सुभाषनगर खोपोली येथील ग्रामस्थांनी शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर या रस्त्याचे कै. सखाराम गेणु जाधव मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खोपोली नगर परिषदेला देण्यात आले आहे. खोपोली शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर हा 50 वर्षे जुना रास्ता कायमस्वरूपी जाण्या-येण्यासाठी करावा, नवी पर्यायी रास्ता नको, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला दिले होते. त्याची दखल घेऊन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या रस्त्याचा विषय घेण्यात आला आहे. या रस्त्यास कै. सखाराम गेणु जाधव मार्ग असे नाव द्यावे, अशी सुभाष नगर ग्रामस्थांची मागणी केली आहे. तसे पत्रही त्यांच्या वतीने देण्यात आले. खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव याच प्रभागातून सलग तीन वेळा निवडून आले होते. 1985 साली निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथम गावात वीजपुरवठा सुरू करण्याचे काम करून घेतले. त्यांच्या नियोजनामुळे सुभाषनगरला पाणीपुरवठा होत आहे. गावातील रस्ते, फुटपाथ, स्ट्रीट लाईट, गटारे आदी नागरी सुविधा त्यांच्या कार्यकाळात उपलब्ध झाल्या आहेत. मस्को (महिंद्रा) कंपनीमध्ये काम करीत असल्याने सखाराम जाधव यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून मस्को कॉलनी (जगदीश नगर) मध्येसुद्धा नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तेथील कामगार व विद्यार्थ्यांसाठी सिटी बस सुरू केली. सुभाष नगर या गावाच्या जडणघडणीत जाधव यांचे मोठे योगदान आहे. 1 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावाचा सन्मान म्हणून मस्को गेट ते सुभाष नगर या रस्त्याला कै. सखाराम गेणू जाधव मार्ग असे नाव देण्यात यावे, असे सुभाष नगरमधील ग्रामस्थांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.