पनवेल : बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुला-मुलांच्या अपहरणांचे सत्र सुरूच असून फेब्रुवारीच्या 15 दिवसांमध्ये नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून 19 मुला-मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात 11 ते 17 वयोगटातील 15 मुलींचा समावेश आहे. पनवेलमधून 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत तीन मुलींचे अपहरण झाले असून या तिन्ही मुली 16 ते 17 वयोगटातील आहेत. खारघरमधून 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत 13 व 15 वर्षीय दोन मुली तर 16 वर्षीय मुलगा अशा तिघांचे अपहरण झाले आहे. उरणमधून 13 ते 21 फेब्रुवारी दरम्यान 15 व 16 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. वाशीगावमधून 18 फेब्रुवारी रोजी 16 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे, तसेच कोपरखैरणेतून 10 ते 12 वयोगटातील दोघे भाऊ, तर पनवेल तालुका, तुर्भे, तळोजा, एपीएमसी, खांदेश्वर आणि रबाळे या भागांतून प्रत्येकी एक अशा 11 ते 17 वर्षीय सहा मुलींचे अपहरण झाले आहे. कामोठे भागातून 10 वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे. 14 ते 15 वयोगटातील अपहरण झालेल्या बहुतांश मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अथवा प्रेमप्रकरणातून पळवून नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, तर इतर मुले-मुली हे आई-वडील अभ्यासावरून रागावल्यामुळे, तर काही मुले अन्य किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून निघून गेल्याचे, तसेच काही मुले मौजमस्ती म्हणून घर सोडून निघून गेल्याचा संशय आहे.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper