पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मंगळवारी (दि. 7) मात करीत मानाची गदा पटकावली.
पुण्याच्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर 3-2ने मात केली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीतले आहेत. दोन्ही मल्लांसह प्रशिक्षक पवार यांचे अभिनंदन होत आहे.