मुंबई : प्रतिनिधी
अंकुर स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
लालबाग येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लबने चुरशीच्या लढतीत विजय क्लबचे आव्हान 28-24 असे संपवत चिंतामणी चषक आपल्या नावे केला.
विजयच्या अक्षय सोनीने पहिल्याच चढाईत गडी टिपत झोकात सुरुवात केली. त्याला प्रतिउत्तर देत अंकुरच्या सुशांत साईलने गडी टिपत 1-1 अशी बरोबरी साधली. हा बरोबरीचा सिलसिला 10व्या मिनिटापर्यंत सुरू होता. त्या वेळी 6-6 अशी बरोबरी होती. मध्यंतराला मात्र 15-13 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात अंकुरला यश मिळाले. ही आघाडी मध्यांतरानंतर 14 मिनिटांपर्यंत टिकली. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा पुन्हा 22-22 अशी बरोबरी साधण्यात विजय क्लब यशस्वी झाला, पण काही मिनिटांतच अक्षय मिराशीने यशस्वी अव्वल पकड करीत अंकुरला पुन्हा दोन गुणांनी आघाडीवर नेले, तर अभिजित दोरुगडेने बोनससह एक गडी टिपत अंकुरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशांत, अभिजित यांच्या पल्लेदार चढाया, त्याला किसन बोटे, अक्षयची मिळालेली पकडीची साथ यामुळे अंकुरला हा विजय मिळविता आला, तर अक्षयसह अजिंक्य कापरे, विजय दिवेकर यांचा खेळ विजय क्लबला विजयी करण्यात कमी पडला.