सीईओ अपर्णा वडके यांना न्यायालयीन कोठडी
पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सीईओ अपर्णा वडके यांना शनिवारी (दि. 29) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या घोटाळाप्रकरणी कारवाईचा फास आवळू लागल्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले असून घोटाळ्याचे सूत्रधार शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव अभिजीत पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कर्नाळा बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळांतील 22 सदस्य आणि इतर अशा एकूण 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून जिल्हा विशेष लेखा परीक्षक उमेश गोपिनाथ तुपे यांनी केलेल्या तक्रारीनुसार भा.द.वि. कलम 409,417,420,463, 465,467,468,471,477,201,120(ब),34सह सहकारी संस्था अधिनियम 1961 कलम 147, सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबधांचे रक्षण अधिनियम, 199चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विवेक पाटील यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते सध्या तळोजा जेलमध्ये आहेत.
कर्नाळा बँकेचे 22 संचालक, 59 ओडी कर्जधारक व दोन सीईओ यांच्यावर 553 कोटी 32 लाख रकमेचा अपहार सभासद आणि ठेवीदार व सरकारची फसवणूक केल्याबद्दल दाखल असलेल्या गुन्ह्यात सीईओ वडके यांना 24 एप्रिल रोजी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यावर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
अपर्णा वडके कर्नाळा बँकेच्या सीईओ असल्याने व त्यांनी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केले असल्याने त्यांना बँकेच्या आर्थिक व्यवहाराबद्दल पूर्ण माहिती होती. त्यामुळे बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणामध्ये अवैध येणारी रक्कम कोठून व कोणत्या माध्यमातून येत होती व ती कोण वापरीत होते याची त्यांना माहिती असल्याने त्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक एम. एस. जगताप यांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.
अपर्णा वडके यांनी स्वतःच्या फायद्याकरिता स्वतःच्या नावे पर्सनल लोन पाच लाख, पतीच्या नावे पर्सनल लोन पाच लाख, आरती वेलनेसच्या नावे सीसी कर्ज 55 लाख व 17 लाख, गुरूकृपा फोटो स्टुडिओकरिता तीन लाख व शैक्षणिक कर्ज 18 लाख असे एकूण एक कोटी 23 लाख कर्ज घेतले असून त्याची व्याजासह थकबाकी एक कोटी 38 लाख 91 हजार 689 रुपये झाली आहे. या रकमेतून त्यांनी स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी किंवा इतरत्र गुंतवली असावी याचा तपास करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक झाल्याने संचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अभिजीत विवेक पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.