पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसूम रवींद्र म्हात्रे यांनी कामोठे गाव स्मार्ट सिटी बनविण्याबाबत कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत व दिव्यांगांना अर्थसहाय्य मदत मिळण्याबाबत अशा विविध मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत.
कुसूम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पनवेल महानगर क्षेत्रातील शहरे स्मार्ट सिटी करण्याकडे राज्य शासनाच्या आदेशानुसार वाटचाल सुरू आहे. शहरांची स्मार्ट सिटी अशी ओळख होत असताना या शहराला लागून असलेल्या कामोठे गावच्या परिसरात सिडको वसाहत आहे, मात्र पूर्वीचे कामोठे गाव हे या स्मार्ट शहरीकरणापासून वंचित राहिले आहे. या गावांना स्मार्ट शहराच्या सुविधांचा लाभ मिळण्यासाठी कामोठे गावाची प्रामुख्याने दखल घेण्यात घ्यावी. हे गाव अनेक वर्षांपासून सोयीसुविधांपासून वंचित असून या ठिकाणी असलेल्या नागरिकांना अपुर्या सुविधांअभावी मोठी गैरसोय होत आहे. या गावात सुसज्ज रस्ते, गटारे, मुबलक पाणी, दिवाबत्ती व्यवस्था, विद्युत वाहिनी भूमिगत करणे, रुग्णालय, व्यायामशाळा, उद्याने व विरंगुळा केंद्र, मासिक बाजार, भाजी मंडई यांसारख्या महत्त्वाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आपण या गावाचाही स्मार्ट शहराप्रमाणे विकास करण्यासाठी लवकरात लवकर प्राधान्य देण्यात यावे.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कामोठे सेक्टर 20मधील भूखंड क्र. 28, 35 आणि 36 गार्डनवर सिडकोने अद्यावत असे गार्डन विकसित केले आहे. या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत चिमुकलेदेखील येऊन आनंद घेताहेत. या गार्डनला रायगडचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. रायगडचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान हे अमूल्य आहे. या परिसरातील आगरी-कोळी बांधवांना तसेच शेतकर्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळवून दिला आणि कमवा व शिका, असा संदेश दिला आहे, तसेच रायगडच्या भूमीसाठी त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. अशा लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचे नाव गार्डनला देऊन त्यांचे नाव अमर व्हावे आणि त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोचवून त्यांच्या बलिदानाला न्याय देण्यासाठी त्यांचे नाव कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला देण्यात यावे.
कुसूम म्हात्रे ज्या प्रभागातून निवडून आल्या आहेत, त्या प्रभागात जवळपास 10 दिव्यांग वास्तव्यास आहेत. या कुटुंबांना पनवेल महानगरपालिका दिव्यांग कल्याण निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत व्हावी तसेच त्यांचे जीवनमान सुधारून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचा हातभार लागेल या उद्देशाने त्यांना ही मदत मिळावी. या दिव्यांग बांधवांच्या यादीत असे काही बांधव आहेत की त्या बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मदत करावी, तसेच काही दिव्यांग आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय मदत करून शासकीय कल्याण निधीचा लाभ मिळावा या हेतूने माझा प्रयल असून या दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत मिळावी. दरम्यान, कुसूम म्हात्रे यांच्या वतीने भाजप नेते रवींद्र म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांसोबतच या निवेदनाची प्रत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनादेखील दिली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper