ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
कडाव : प्रतिनिधी
मागील अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. कर्जत तालुक्यातील किरवली व चिंचवली या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ना. रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या सावरगाव येथील निवासस्थानी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. जनसेवा करत राहा, जनता आपल्याला भरभरून पाठिंबा देईल, असा विश्वास त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश भगत, सोशल मीडिया सेलचे कर्जत विधानसभा अध्यक्ष विलास श्रीखंडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सुगंधा भोसले, कर्जतच्या माजी नगरसेविका बिनिता घुमरे, उमरोली पंचायत समिती अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह उमेदवार व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.