नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी विशिष्ट तक्ते वापरून नेत्रतपासणी केली. पोलिसांची दिनचर्या पाहता अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब व मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. नेत्रपटल अतिरक्तदाब आणि मधुमेह या दोन आजारांत खराब होते व त्यामुळे अंधूक दिसते. तसे होऊ नये यासाठी या दोन्ही आजारांत नेत्रपटलांची नियमित तपासणी करावी लागते, अशी माहिती लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या उपस्थित डॉक्टरांनी दिली. या उपक्रमाचे उद्घाटन महामार्ग पोलीस ठाणे विभागाचे उपअधीक्षक विजयसिंग पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष प्रिया पाटील, सचिव सायली सातवडेकर, प्रोजेक्ट चेअरमन (मेडिकल) डॉ. संजीवनी गुणे व दीपक गडगे यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी 40 पोलीस कर्मचार्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच 55 पोलीस कर्मचार्यांना पुढील तपासणीसाठी पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले आहे. या उपक्रमास पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर व महामार्ग केंद्र पळस्पे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचे विशेष सहकार्य लाभले.