Breaking News

न्यूझीलंडने रोखला भारताचा अश्वमेध

‘विराटसेने’ने वन-डे मालिका गमावली

ऑकलंड : वृत्तसंस्था
टी-20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौर्‍याची धडाकेबाज सुरुवात करणार्‍या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात करीत वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 274 धावांचे आव्हान भारतीय संघाला पेलवले नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रवींद्र जडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करीत चांगली झुंज दिली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
या पराभवासह भारताची 2019 विश्वचषकानंतर सुरू झालेली विजयाची मालिका खंडीत झालेली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतल्या बरोबरीचा अपवाद सोडला, तर एकाही मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला नव्हता.
पहिल्या वन-डे प्रमाणे दुसर्‍या सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतले फलंदाजही ढेपाळले. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. यानंतर मधल्या फळीत रवींद्र जडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचे आव्हान कायम ठेवले, मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली. जडेजाने 55 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.
आधी ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली. चहलने निकोलस याला 41 धावांवर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला 150च्या जवळ पोहोचवले. तेव्हाच ब्लंडेलला शार्दुलने बाद केले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने 79 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळण्यास सुरुवात झाली. गप्टिल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 157 अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी न्यूझीलंडची अवस्था 8 बाद 197 अशी केली.
अखेरच्या षटकात रॉस टेलर आक्रमक खेळ केला त्याला काईल जेमिसन चांगली साथ दिली. टेलरने नाबाद 73 धावा केल्या. टेलर-जेमीसन जोडीने नवव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची भागीदारी केली. ऑकलंड मैदानावर आणि न्यूझीलंडकडून नवव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर दोन आणि रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply