Breaking News

अंबा नदीचे पाणी झाले चिखलयुक्त; पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो.  गुरुवारी (दि. 5) उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जाते. आजूबाजूच्या कारखान्यांतील प्रदूषित पाणीदेखील नदीमध्ये सोडण्यात येते. पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नळाच्या पाण्यातून शेवाळ व चिखल हे नेहमीच येत असते. परिणामी पालीतील नागरिक आणि भाविकांना नाईलाजाने गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. नियमित पाणीपट्टी भरूनदेखील प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

उन्हेरे धरणातून चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. गाळ साचल्याने नदीचे पात्र अरुंद होईल. पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो. तसेच हा गाळ पाणी खेचणार्‍या मोटार पंपात जाऊन पंप बंद पडू शकतात. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.

-अमित निंबाळकर, माजी सदस्य, पाली ग्रामपंचायत

 

पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता  उन्हेरे धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नगरपंचायतीद्वारे पाण्यात औषध टाकण्यात आले आहे. तसेच दोनतीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.

-सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

 

उन्हेरे धरणाची जॅकवेल व तेथील दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा दरवाजा उघडल्याने धरणात साठलेला काही गाळ पाण्यामार्फत अंबा नदीला मिळाला आहे. एक दोन दिवसांत हा गाळ खाली बसेल व पाणी स्वच्छ होईल.

-राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोलाड

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply