Breaking News

खारघर-मुंब्रा नवा मार्ग; पनवेल महापालिकेचा पुढाकार

पनवेल ः बातमीदार  : खारघरमधील सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पांजवळील रोंहिजण गावाजवळून थेट पनवेल-मुंब्रा महामार्ग गाठणे आता सोपे होणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून 10 कोटी रुपये खर्च करून नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

खारघर सेक्टर 36, 37, 38 आदी भागांतून मुंब्रा, कल्याण, ठाणे या भागाकडे जाण्यासाठी खारघरमधून एकमेव रस्ता आहे. तळोजा पाचनंद गावाजवळून हा रस्ता जोडला जातो. पनवेल महापालिकेने सध्याचे नागरिक आणि भविष्यात या भागात राहण्यासाठी येणार्‍या नव्या गृहप्रकल्पातील नागरिकांची गरज ओळखून नवा रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या भागातील नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत पनवेल-मुंब्रा मार्गावरील खुटारी गावाच्या पुढे निघता येणार आहे. त्यामुळे शिघ्रकृती दलाच्या बटालियनजवळून जाणार्‍या रस्त्याला वळसा घालण्याची गरज लागणार नाही. याशिवाय महापालिका क्षेत्रातील या भागात राहणार्‍या नागरिकांनाही खारघरमध्ये जाण्यासाठी जवळचा मार्ग तयार होणार आहे.

35 मीटर रुंदीचा हा मार्ग तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या रस्त्यासाठी पनवेल महापालिकेला 12 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून, काँक्रिटचा रस्ता असणार आहे. पुढे महामार्गाला जोडण्यासाठी दीड किलोमीटरचा सेवा रस्तादेखील काढण्यात येणार आहे. या सर्वांसाठी महापालिकेला 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय जमीन संपादन प्रक्रियेसाठी महापालिका जमीनमालकांना टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देणार आहे. त्यामुळे महापालिकेला संपादन प्रक्रियेसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

रोहिंजण गावातील शेतकर्‍यांची जमीन यासाठी संपादित होणार आहे. कल्याण, ठाणे, मुंब्रा, शिळफाटा आदींसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नोकरी-व्यवसाय करणार्‍यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरेल. सिडकोची मेट्रो सुरू झाल्यानंतर बेलापूरहून खारघर सेक्टर 36, 38चा प्रवास आणि तिथून या जोडरस्त्याचा वापर नागरिकांना करता येणार असल्यामुळे त्यांनी रस्त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. पनवेल महापालिकेने नागरिकांना चांगली सुविधा द्यावी या हेतून हा रस्ता तयार केला असून अशा पद्धतीचे रस्ते वाहतूक कोंडी कमी करण्यास फायदेशीर ठरतील, असा विश्वासही पालिका आयुक्त देशमुख यांनी व्यक्त केला.

पनवेल महापालिका पहिल्यांदाच स्वतंत्र रस्त्याची उभारणी करणार आहे. यासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असून, तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. – ए. ए. शेख, उपसंचालक-नगररचना, पनवेल महापालिका

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply