पनवेल : रामप्रहर वृत्त : खारघर सेक्टर 8मधील भूखंड क्रमांक 9वर पनवेल महानगरपालिकेच्या राखीव असलेल्या मागासवर्गीय निधीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व ग्रंथालयाची निर्मिती करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांना सोमवारी (दि. 17) निवेदन देण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या जागेवर भव्य वास्तू उभारून सभागृह व ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
पनवेल महापालिकेच्या येणार्या महासभेमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करून घेण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड व सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिली. या सभागृह व ग्रंथालयाचा लाभ खारघरमधील जनतेला मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
निवेदन देतेवेळी नगरसेविका आरती नवघरे, भाजप नेते कीर्ती नवघरे, विलास निकम, रमेश तपासे, सनी नवघरे व खारघरमधील नागरिक उपस्थित होते.