Breaking News

रायगडात पर्यटक जलवाहतूक बंद

पर्यटनस्थळांवर बंदी; अत्यावश्यक प्रवासी सेवा मात्र सुरूच

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी चालविले जाणारे जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच पर्यटक जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. मात्र प्रवासी जलवाहतूक ही अत्यावशक सेवा असल्यामुळे ती सुरु राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, घारापुरी लेणी तसेच इतर पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आता  पर्यटक जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. न्यायालयाच्या कामाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी जलक्रीडा प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प चालविण्यात येतात. अशा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रात चालू असलेले जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मार्वे मनोरी व एक्सेलवर्ड, बोरीवली ते एक्सेलवर्ड, थळ ते खांदेरी किल्ला, किहिम ते खांदेरी किल्ला, दिघी ते जंजिरा किल्ला, मुरुड ते जंजिरा किल्ला, मुरुड ते पद्मदुर्ग (कासा किल्ला),राजपुरी ते जंजिरा किल्ला, मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला, पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या पर्यटन स्थळा दरम्यान होत असलेली पर्यटक जलवाहतूक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात यावी,  असे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाचे  (एमएमबी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांनी दिले आहेत. जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन सदर ठिकाणची जलप्रवासी वाहतूक सुरळीतपणे सुरु ठेवण्यात यावी, असे डॉ. रामास्वामी यांनी कळविले आहे. जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन गोफण-सानेगाव-गोफण, राजपुरी-दिघी-राजपुरी, दिघी-आगरदांडा (रो-रो), दिघी-आगरदांडा-दीघी या जलमार्गावरील जलप्रवासी वाहतूक  सुरु ठेवण्यात यावी,  असे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड राजपुरी बंदरे समुह उपसंरक्षक तथा प्रादेशीक बंदर अधिकारी  कप्तान सी. जे. लेपांडे यांनी कळविले आहे.

जिल्हा न्यायालयाचे कामकाज अडीच वाजेपर्यंत 

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायालयाने न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाचे काम 31 मार्चपर्यंत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30  या वेळेत होणार आहे. न्यायालयाची कामकाजाची वेळ ही अकरा ते दोन राहणार आहे. या वेळेत मोजकीच महत्वाची कामे केली जाणार आहेत. विधी सेवाच्या माध्यमातून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझरची सुविधाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सचिव संदीप स्वामी यांनी दिली. रिमांड, महत्त्वाचे आदेश, जामीन अर्ज आणि 164 चे जबाब ही कामे न्यायालयात चालणार आहेत. दुपारी अडीचनंतर कोणीही न्यायालयात थांबू नये, असे आदेश परिपत्रकात दिले आहेत. न्यायालयीन कामाच्या वेळी कर्मचारी मास्क लावून काम करणार आहेत. विधी सेवा प्राधिकरण समितीमार्फत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्यास सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. कोरोना विषाणूपासून बचाव कसा करावा याबाबत टीव्ही आणि फलक संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. 31 मार्चपर्यत पक्षकारांनी जिल्हा न्यायालय प्रशासनाला सहकार्य करून स्वत:चाही कोरोना विषाणूपासून बचाव करावा, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.

किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी किल्ले रायगडावर जाणारी रोप वे सेवा बंद करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे गडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद होणार आहेत. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. त्यानुसार आता किल्ले रायगडावरील रोप वे सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ले रायगडावर दररोज हजारो पर्यटक येत असतात. यात देश-विदेशातील पर्यटकांचा समावेश असतो. यामुळे रोप वेजवळ मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. या गर्दीमुळे करोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रोप वे सेवा बंद ठेवली जाणार आहे. प्रकल्प अधिकारी राजेंद्र खातू यांनी याबाबतचे प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे. त्यामुळे रायगडचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद झाले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply