Thursday , March 23 2023
Breaking News

पेणकरांना नगरपालिकेचा दिलासा

चर्चेअंती अर्थसंकल्पास मंजुरी, कोणतीही करवाढ नाही

पेण : प्रतिनिधी

कोणतीही करवाढ नसलेल्या पेण नगर परिषदेच्या 50 कोटी 42 लाख 62 हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये शिलकी अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक दोन कोटी 53 लाख 97 हजार 847 रुपये असून सन 2018-19 या आर्थिक वर्षाची मागील शिल्लक धरून सन 2019-20 ची एकूण 51 कोटी 69 लाख 23 हजार 847 रुपये एकूण जमा अपेक्षित आहे, तर 2019-20 चा अंदाजित खर्च 49 कोटी 15 लाख 26 हजार रुपये एवढा दाखविण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन व वसुली खात्यासाठी सात कोटी 99 लाख 15 हजार रुपये, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी दोन कोटी 13 लाख 15 हजार रुपये, आरोग्य व सुखसोयीसाठी 14 कोटी 86 लाख 80 हजार  व शिक्षणासाठी 29 लाख 50 हजार अशा प्रामुख्याने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गटारे, स्मशानभूमी, रस्ते, अग्निशमन  आदींकरिता तरतुदी करण्यात आल्या असल्याचे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती देवता साकोस्कर, पाणीपुरवठा सभापती नलिनी पवार, महिला व बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर, नगरसेविका अश्विनी शहा, मुख्याधिकारी अर्चना दिवे आदी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात नवीन रस्ते करण्यासाठी एक कोटी आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. थीम पार्क विकसित करण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता 10 लाख, मच्छीमार्केट नुतनीकरणासाठी 40 लाख, एलईडी पथदिवे बसविणे कामी 30 लाख आणि सर्व अभिलेख जतन करणे कामी (डिजीटलायझेशन) 20 लाख अशा तरतुदी करण्यात आल्या असल्याची माहिती नगराध्यक्षांनी या वेळी दिली.

विशेष तरतुदी

या अर्थसंकल्पात नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी चार कोटी रुपये, नगरोत्थान अभियानांतर्गत व ओएआरडीएस या योजनेतून आगरी समाज हॉल ते हिमास्पन पाईप कंपनीपर्यंत विकास रस्ता तयार करणे, बीओटी तत्त्वावर भाजीमार्केट बांधणे, सोलरवर वीजनिर्मिती करणे, भुयारी गटार योजनेसाठी डीपीआर तयार करणे, महिला व बालकल्याण निधी, दुर्बल घटक निधी व अंध, अपंग कल्याण निधी यासाठी नियमांनुसार तरतूद ठेवण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही, तसेच सैनिक व माजी सैनिकांना मालमत्ता करावर सूट देण्याचे देखील प्रस्तावित आहे. 

-प्रितम पाटील, नगराध्यक्षा, पेण

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply