पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला जाणारा घाटरस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटरस्ता पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून पोलादपूर महसूल तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतरण होऊ नये, यासाठी चोवीस तास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कारणाखाली फिरणार्या काही खासगी वाहनांमधून अनेक चाकरमानी गावांगावांमध्ये पोहोचल्याची माहिती प्राप्त होत आहे.
पोलादपूर तालुक्यात कारोना व्हायरसच्या संसर्गासंदर्भात सुरू असलेल्या संचारबंदीच्या सहाव्या दिवशी पोलीस, पंचायत समिती आणि तहसिल कार्यालय सतर्कपणे कार्यरत असल्याचे दिसून आले. पाचव्या दिवशी रात्री पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील कशेडी टॅप येथे तहसिलदार दिप्ती देसाई आणि नायब तहसिलदार समीर देसाई यांनी जिल्हाहद्द बंदीच्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष कशेडी वाहतूक टॅप पोलीस चौकी येथे भेट देऊन पाहणी केली. तेथे काही वाहने वाहतूक पोलीसांनी अडवून धरली होती. याठिकाणी कोणतीही चहा नाश्ता सुविधा नसतानादेखील येथून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणारे प्रवासी सोबतच्या महिला आणि बालकांच्या आणाभाका घालून प्रशासनाला मायेचा पाझर फोडू पाहात असल्याचे दिसून आले. या प्रवाशांना ज्या शहरातून आलात तेथे परत जाण्याचे आदेश दिल्यानंतर प्रवासी रात्रभर राहून सकाळी मार्गस्थ होण्याच्या मानसिकतेत दिसून आले.