म्हसळा : प्रतिनिधी – कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे.
तालुक्यातील एक नगरपंचायत व 39 ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या शहरांमधून आलेल्या नागरिकांमध्ये काही लक्षणे आढळत तर नाहीत ना याचा शोध या सर्वेक्षणातून घेतला जाणार आहे. त्यातूनच आशा सेविकांना तक्त्यांचा एक अर्ज देण्यात आला असून, त्यात माहिती भरून घेतली जात आहे. जिल्ह्यात हे काम 22 मार्चपासून सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे परदेशातून किती नागरिक आले? नागरिकांना कोणता आजार आहे? श्वसन विकाराचे लक्षण? आदी माहिती संकलित होणार आहे़. होम क्वारंटाईन शिक्का मारला आहे का? परजिल्ह्यातून किती नागरिक दाखल झाले? अलगीकरणाबाबत माहिती, या माहितीच्या आधारे आरोग्य यंत्रणेला आता उपचार करणे सोयीचे होणार आहे. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात 39 ग्रामपंचायतीमधीत 50235 लोकसंख्येसाठी नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील 9676 लोकसंख्येसाठी नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काम पाहतील. दर सोमवारी ग्रामपातळीवरील माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.