कर्जत ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि कर्जत वकील संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. 8) कर्जतपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने न्यायदात्यांनीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
संचारबंदीमुळे या आदिवासी पाड्यांपर्यंत जाणारे रस्ते बंद झाले आहेत. अतिशय दुर्गम भागात राहणार्या या आदिवासी बांधवांना विशेषतः एकट्याने राहणार्या विधवा, ज्येष्ठ महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिसरात अद्याप कोणत्याच प्रकारची मदत पोहचली नव्हती. हे लक्षात घेत वकील संघटनेच्या पदाधिकार्यांनी या परिसरात अत्यावश्यक मदत देण्याचे निश्चित केले. माणुसकीच्या नात्याने फूल ना फुलाची पाकळी देण्यासाठी अनेक वकील स्वत:हून पुढे सरसावले. कर्जत वकील संघटनेसोबतच कर्जत न्यायालयातील कर्मचारीही यात सहभागी झाले होते.
कर्जत तालुका दिवाणी न्यायाधीश मनोद तोकले यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. योगेश देशमुख, अॅड. राजेंद्र निगुडकर, अॅड. प्रवीण खडे, अॅड. भूपेश पेमारी, अॅड. योगिनी बाबर यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील दिवाळवाडी येथील आदिवासी वस्ती आणि बलिवरे येथील बौद्धवस्तीतील गरजू, विधवा आणि ज्येष्ठ महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यात तेल, तिखट मिठापासून डाळ, साखर, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.यासाठी कर्जत वकील संघटनेचे उपाध्यक्ष महेश घारे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजय मेढी, अॅड. श्री व सौ. चव्हाण, अॅड. अभिराज शिंदे, अॅड. नरेश अहिर, अॅड. सतीश डायरे यांच्यासह सुमारे 28 पदाधिकार्यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. कोर्टाच्या आवारात न्यायदानाच्या कामात मदत करणार्यांचे हे दातृत्व आणि माणुसकीचा ओलावा पाहून आदिवासी बांधवांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper