Breaking News

पागोट्याच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

गुप्त मतदानाद्वारे आठ विरुद्ध दोन निकाल

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 29) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सरपंचांविरोधातील अविश्वासाचा ठराव आठ विरुद्ध दोन असा संमत करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाचे भार्गव पाटील हे मागील तीन वर्षांपूर्वी जनतेतून थेट सरपंच म्हणून निवडून आले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याविरोधात पागोटे ग्रामपंचायतीमधील नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी 22 जानेवारी 2021 रोजी उरण तहसीलदारांकडे अविश्वास ठराव सादर केला होता. त्यामुळे भार्गव पाटील यांचे सरपंच पद अडचणीत आले होते.

ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 नुसार अविश्वास ठराव सादर करण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस देणे आवश्यक असल्याने तशा प्रकारे पागोटे ग्रामपंचायती मधील आठ सदस्यांनी सरपंचांविरोधात ठराव सादर केला होता. त्यामुळे उरण तहसिलदारांनी पागोटे सरपंचासह नऊ सदस्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित केली होती.

या वेळी 10 सदस्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष सभेत गुप्त मतदान घेण्यात आले. सरपंच भार्गव पाटील यांच्या विरोधात आठ विरुद्ध दोन असे मतदान झाले. त्यामुळे सरपंचांची पुरती नाचक्की झाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 नुसार कार्यवाही करण्यात आल्याचे तहसीलदारांनी नमूद करून या सभेचा निकाली अहवाल जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविण्यात येणार असून, जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीनंतर ग्रामसभा बोलावून जनमत चाचणी घेणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले.

  शेतकरी कामगार पक्षातून निवडून आलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे थेट सरपंच, एक राष्ट्रवादी काँग्रेस तर उर्वरित आठ सदस्य भारतीय जनता पक्ष असे या ग्रामपंचायतीमधील बलाबल असून, जनमत चाचणीनंतर या पागोटे ग्रामपंचायतीवर निर्विद व एकहाती भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येथील भाजप सदस्यांनी विजयाची खूण दाखवीत आनंद व्यक्त केला आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply