महाड : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात युतीच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. 16) महाड येथे झाली. या बैठकीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, ही लढाई म्हणजे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेल्या तटकरेंच्या धनशक्तीविरोधात निष्कलंक गीतेंच्या जनशक्तीची आहे, असे प्रतिपादन केले.
महाडमधील पीजी रिजन्सी येथे झालेल्या या बैठकीला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, भरत गोगावले, बाळ माने, माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवी मुंडे आदी उपस्थित होते.
2014च्या निवडणुकीत शेकापने तटकरेंच्या भष्ट्राचाराची छापलेली पुस्तिका घरोघरी पोहोचवा असे ना. देसाई यांनी सांगून संभ्रम निर्माण करणार्या सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नका व एकदिलाने काम करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. हिंदुत्वाच्या विचारांसाठी प्रत्येकाने युतीचा धर्म पाळावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी अर्थात रायगडचे नेतृत्व भ्रष्ट तटकरेंच्या हाती जाऊ देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले.
विकासकामांच्या शिदोरीवर प्रचार करून नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करण्याचा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रवीण दरेकर यांनी गेल्या 15 वर्षांच्या काळात न दिसलेला विकास युतीच्या काळात दिसला आहे असे सांगत, कार्यकर्त्यांनी पक्षीय आचारसंहिता पाळाव्यात, असा सल्लाही दिला; तर देशाला नरेंद्र मोदीच पंतप्रधान म्हणून हवे आहेत व यासाठी अनंत गीतेंना मतदान करा, असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केले. या बैठकीचे सूत्रसंचालन शिवसेना शहरप्रमुख नितीन पावले यांनी केले.