जनतेची एकमुखी मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
खरे पाहता आयुष्यभर खस्ता खात केलेल्या (तथाकथित) समाजकार्यामुळे प्रसिद्ध ठरलेल्या कांती कडू हे 2006 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला, तसेच 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहू न शकल्यामुळे पनवेलकर या अफाट लोकप्रियता लाभलेल्या लोकप्रतिनिधीला मुकले. केवळ त्यामुळेच प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष आणि दोनदा आमदार होऊ शकले, असे कांती कडू आणि त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
प्रीतम म्हात्रे यांनी 2011 साली पनवेल नगर परिषदेच्या निवडणुकीत तूल्यबळ उमेदवाराच्या विरोधात उभे राहावे म्हणून आपला मतदारसंघ सोडून वॉर्ड क्रमांक 4 निवडला आणि कांतीशी लढत दिली, पण हाय रे दुर्दैव कांतीच्या हातून इथेही विजय निसटला. कांती कडूला काँग्रेसने न्याय दिला नाही. त्यामुळेच 2006 साली नगराध्यक्ष पदावर, तसेच 2009 आणि 2014 साली आमदार पदावर प्रशांत ठाकूर विराजमान झाले. खरे तर कांती कडू उभे न राहिल्यामुळेच प्रशांत ठाकूर यांना नगराध्यक्ष आणि आमदार पदाचा मान मिळाला, ही बाब काँग्रेस श्रेष्ठींनी आता तरी लक्षात घ्यावी.
काँग्रेस पक्षासाठी तन-मन तर सोडाच, पण म्हणे धनही जोडून कांती कडू यांनी खूप काम केले. अशाच कामाचा भाग म्हणून याच कडू महाशयांनी मध्यंतरी काँग्रेसमधील ज्येष्ठांची एक बैठक घेऊन पनवेल विधानसभा निवडणुकीची तयारी चालविल्याचे समजते. त्यांनी काँग्रेस विचार सेलचे जिल्हा अध्यक्ष म्हणूनही अफाट काम केले आहे. त्यामुळे त्यांचा असा दृढ समज झाला आहे की ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात सहज निवडून येतील आणि त्यामुळे कडू यांनाच गोड मानून उमेदवार म्हणून निवडावे, अशी चर्चा पनवेलच्या नाक्या नाक्यावर चालू आहे. या चर्चेचा काँग्रेस पक्षाने आता तरी गांभीर्याने विचार करावा.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पनवेल येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात प्रशांत ठाकूर यांना विचारले की, तुम्हाला वाढदिवसाची काय भेट पाहिजे. त्यावर प्रशांत ठाकूर यांनी मंत्रिपद किंवा वैयक्तिक लाभाचे काही एक न मागता पनवेलमध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाची मागणी केली. हा उड्डाणपूल उभा राहिल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी केवळ श्रद्धेच्या पोटी या उड्डाणपुलाला तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिले, मात्र परवानगी नसताना हे नाव का दिले? असा वाद कांती कडू यांनी निर्माण केला. यावरूनच डॉ. नानासाहेबांच्या नावास कडू यांचा विरोध असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे त्यांची विरोधाची दुटप्पी भूमिकाही स्पष्ट होते. त्यांच्या या दुतोंडी भूमिकेमुळे श्रीसदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वास्तविक, पनवेल येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आल्यानंतर या सत्कार्याला शासनाची परवानगी मिळेल हे आमदार प्रशांत ठाकूर जाणून आहेत, शिवाय परवानगी न मिळून कारवाई झाल्यास त्या परिणामांना सामोरे जाण्यासही ते तयार आहेत. त्याची चिंता कांती कडू यांनी कृपया करू नये.
श्रीसदस्यांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून एकीकडे त्यांचा मार खायचा आणि प्रकरण अंगाशी आल्याने धर्माधिकारी कुटुंबीयांची सपशेल माफी मागावी लागली. त्यामुळेच आप्पासाहेबांना घरी आणून आपण त्यांचेच अनुयायी असल्याचे सोंगदेखील या बहुरूप्याने चांगलेच वठवले आहे. तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लाखो लोकांना चांगली शिकवण देऊन त्यांच्यात सुधारणा केली आहे. त्याच मोठ्या मनाने आप्पासाहेबांनी कांती कडूला सुधारण्याची संधी दिली. यातच आप्पासाहेबांचे खरे थोरपण आहे. (मात्र, कांती कडू सुधारले की नाही सुधारले, हा भाग वेगळा.)
ठाकूर पिता-पुत्रांना जनता खूप विटलेली आहे! पनवेलमधील जनतेचे, युवकांचे आणि सर्व समाजाचे प्रश्न ठाकूर पिता-पुत्र नव्हे; तर कांती कडू हेच सोडवू शकतात, हे काँग्रेसला कधी कळणार? त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा पराभव करायचा झाल्यास काँग्रेसने पनवेल विधानसभेची जागा शेकापकडून मागूनच घ्यायला हवी; कारण कांतीलाल कडू आणि त्यांच्या समर्थकांची अशी भावना झाली आहे की आता आमदार प्रशांत ठाकूर यांचा पराभव केवळ आणि केवळ कांती कडू हेच सहजपणे करू शकतात. इतकेच काय तर 2017मध्ये झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे संपूणर्र् नेतृत्व कांती कडू यांच्याकडे दिले असते; तर पनवेल महापालिकेतील सत्ता काँग्रेसच्या ‘हाता’तून निसटली नसती. ते पाहता काँग्रेसने आता तरी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्याची कृपा करावी. सर्वपक्षीयांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. इतके करूनही काँग्रेसने कांतीलाल कडू यांना विधानसभेचे तिकीट न दिल्यास कडू नव्हे, तर काँग्रेसच दुर्दैवी म्हणावी लागेल.
बिलच निघाले नाही; तर रक्कम लाटण्याचा प्रश्न येतोच कुठे?
खोटे बोल पण रेटून बोल अशी पित पत्रकारिता करणार्या कांतीलाल कडू यांनी, वडाळे तलावात श्रीसदस्यांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे बिल पनवेल नगर परिषदेच्या माध्यमातून ठाकूर कंपनीने काढल्याचा जावईशोध लावला आहे, मात्र प्रत्यक्षात नगर परिषदेने असे कुठल्याही प्रकारे बिल काढलेले नाही, अशी माहिती पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली. जर बिलच काढले गेलेले नसेल, तर रक्कम लाटण्याचा प्रश्न येतो कुठे? त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या कांती कडू यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल यानिमित्ताने पनवेलकर उपस्थित करीत आहेत.