कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसूडगाव परिसरात कोरोनोचा शिरकाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आसुडगाव परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फुर्तीने दि. 24, 25, 26 एप्रिलला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला सर्व जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशासह व राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तरीही पनवेलमधील कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. त्यात आसूडगाव परिसराला लागून असलेल्या खांदा कॉलनीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने खांदा कॉलनी रहिवाशांत भितीचे वातावरण आहे.
कोरोना हळूहळू पाय पसरतोय तरीही काही नागरिक थट्टेवारी नेऊन जीवनावश्यक वस्तूचे नाव पुढे करून टवाळगिरी करताना दिसून येतात. नागरिकांना कोरोनावर मात करायची असेल तर घरातच थांबणे सक्तीचे करून सुद्धा काही लोकं भटकताना दिसून येत आहेत त्यांच्या या टवाळगिरीमुळे पोलीस, पालिका प्रशासन
हतबल आहे.
खांदा कॉलनीमध्ये तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसुडगावातील व शहरातील लोकप्रतिनिधींनी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येवून कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून एकत्र येवून गर्दीला आवर घालताना 24 ते 26 एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपणच आपल्या मनाला आवर घातला तर कोरोना आपल्यापासून दूर पळेल हाच संदेश यातून दिला जातो. त्यामुळे संपुर्ण परिसरात शुकशुकाट जाणवला.