उरण : वार्ताहर
कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये या करिता 17 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिक आपल्याला खर्चासाठी लागणारे पैसे बँकेत न जाता एटीएमचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. पैसे काढण्यासाठी उरण शहरात एटीएमसमोर मोठी रांग लागत आहेत. त्यातच मोरा येथील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गेल्या पाच दिवसापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गैरसोय होत आहे. मोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद असल्याने या परिसरातील मोरा, भवरा, हनुमान कोळीवाडा आदी ठिकाणी राहणार्या ग्राहकांना पैसे काढणे मुष्कील झाले आहे. त्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ऑटो रिक्षा व इतर वाहने बंद असल्याने उरण शहरात जाऊ शकत नाही. पैशाची जरुरी असल्याने वेळेवर पैसे मिळू शकत नाही, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक हैराण झाले आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. या समस्येकडे संबंधित अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी विनती ग्राहक करीत आहेत.