पनवेल : वार्ताहर
पावणे दोन महिन्यापासून पनवेल परिसरात मद्यासाठी धावपळ करणार्या मद्यप्रेमींचा जोर आता ओसरला असून अनेकांनी या काळामध्ये दुप्पट ते तीप्पट अशा चढ्या भावाने दारुची खरेदी केली होती. परंतु आता सदर खरेदी सुद्धा आटत चालली असून चढ्या भावाने विकण्यासाठी साठा करून ठेवणार्या विक्रेत्यांच्या धंद्याला सुद्धा कोरोनाची मंदी आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन पद्धतीने दारु विक्री करण्याचा निर्णय रायगड जिल्ह्यामध्ये घेतला होता. परंतु पनवेल व उरण विभागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्याने या तालुक्यांना या सेवेमधून वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेकांनी काही दिवसापूर्वी मोहोपाडा, पेण, कर्जत, रसायनी, चौक आदी भागामध्ये दारु विक्री सुरू झाल्याने तेथून माल खरेदी केला होता. परंतु रांगेत उभे राहणे तसेच दारु आणताना पोलिसांचा ससेमिरा चुकविणे यामुळे पनवेलकर सध्या चांगलेच गर्भगळीत झाले आहेत. त्यामुळे सध्या दारु खरेदी करण्याचा जोर ओसरताना दिसत असून सध्या त्या ठिकाणी सुद्धा खरेदी करणार्यांची गर्दी कमी
झाली आहे.
पूर्वीपेक्षा आता अनेक व्हॉटसअप ग्रुपवर दारु विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मेसेज दरासह येवू लागले आहेत. यामध्ये सुद्धा आता भाव कमी करण्यास चढाओढ सुरू झाली आहे. त्याचा फायदा मद्य शौकींनाना होवू लागला आहे. अनेकांचे पगार झाले नाहीत. काहींना अर्धा पगारच मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव व इतर दुकाने उघडल्याने तसेच आगामी काळातील शाळेची फी, वह्या पुस्तके, रेनकोट आदी खरेदी करावयाची असल्याने मद्यप्रेमींनी आता मद्य खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केले असून अजून पुढील आठवड्यात लॉकडाऊनच्या काळात मद्य खरेदी करणार्यांची संख्या कमी होईल असा विश्वास मद्य विक्रेत्यांकडून
करण्यात येत आहे.