प्रांताधिकार्यांचे स्पष्टीकरण
माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून निजामपूरसह माणगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे विभागातील शेतकरी व छोटे व्यापारी हवालदिल झाले होते. अफवांमुळे निजामपूर शहरातील बाजारपेठ 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय निजामपूर व्यापारी असोसिएशन व लोकप्रतिनिधींनी घेतला होता, परंतु असे बाजारपेठ बंद करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. ते सर्वस्वी जिल्हाधिकार्यांच्या अधिकारात येते. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे निजामपूरमधील बाजारपेठ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या ठरावीक वेळेत सुरू राहणार असल्याचे माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी व्यापारी असोसिएशन व निजामपूर विभाग कोविड 19 समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. या वेळी तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, मंडळ अधिकारी, तलाठी व निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गुरव, सुधीर पवार, जनार्दन मानकर, माजी सरपंच हामजा जालगावकर, डॉ. अभिजित पाटसकर, डॉ. बालाजी केंद्रे, निजामपूर विभागातील सरपंच, पोलीस पाटील तसेच व्यापारी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तंतोतंत पाळावे लागणार आहे. बाजारपेठेत गर्दी न करता आवश्यक वस्तूंचीच खरेदी करावी. विनाकारण बाहेर फिरू नये. या लढ्यात सर्वच स्तरावर चांगले काम होत असून आता प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे येथील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दखल घ्यावी. लहान मुले, ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी या वेेळी केलेे.