Breaking News

ही गुर्मी येते कुठून?

गेल्या आठ वर्षांत इतके फटके खाऊनदेखील काँग्रेसजनांना अजुन शहाणपण येत नाही, याला काय म्हणावे? राष्ट्रपतींच्या अपमानावरून देशभर संतापाची लाट उसळूनही अधीर रंजन चौधरी आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी संसदेची माफी मागितली नाही. जनतेने वारंवार लाथाडूनही या पक्षाच्या नेत्यांमधील उर्मटपणा काही कमी होताना दिसत नाही असे वारंवार घडताना दिसते.

काल-परवापर्यंत महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याची भाषा करणारा काँग्रेस पक्ष स्वत:च्या नेत्याला सक्तवसुली संचलनालयाचे निमंत्रण आल्याबरोबर पार बदलला. जनहिताच्या मुद्यांवरील आंदोलने काही तासांत विसरली गेली आणि स्वत:च्या नेत्यांना वाचवण्यासाठी काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले. सक्तवसुली संचलनालय ऊर्फ ईडीने नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू केली आहे. एकूण तीन वेळा त्यांना ईडीने बोलविले. या तिन्ही वेळा काँग्रेस नेते, खासदार, आमदार आणि काही तुरळक कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर आले. राजधानी दिल्लीत धरणे आंदोलन करताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचे तारे तोडले. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा हिणकस उल्लेख केला. त्यावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. अधीर रंजन चौधरी हे गृहस्थ आक्रस्ताळे आणि बेताल बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच. गेले तीन दिवस महागाई आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या मुद्यावर काँग्रेस आणि अन्य विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नव्हते. महागाईसारख्या मुद्यावर सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणे हे विरोधकांचे कर्तव्यच आहे हे समजून घेण्याजोगे आहे. परंतु श्रीमती गांधी आणि एकंदर गांधी परिवार यांच्या बचावासाठी संपूर्ण संसद वेठीला धरणे निषेधार्हच मानायला हवे. त्यात चौधरी महाशयांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा अवमानजनक उल्लेख करून आगीत आणखी तेल ओतले. गेले तीन दिवस विरोधीपक्षांचे तांडव बघत शांतपणे बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गुरूवारी आपला उग्र अवतार दाखवला. राष्ट्रपतींच्या अवमानाबद्दल अधीर रंजन चौधरी आणि श्रीमती सोनिया गांधी या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरली. त्यामुळे उद्भवलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. संसदेच्या परिसरात श्रीमती सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामध्ये जाहीर ठिणग्या उडालेल्या दिसल्या. श्रीमती गांधी यांना नम्रपणे प्रश्न विचारूनही इराणी यांना ‘तुम्ही माझ्याशी बोलू नका’ असे श्रीमती गांधी यांनी सुनावले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या उर्मटपणाला सीमाच उरलेली नाही. माझ्याकडून केवळ भाषेची चूक झाली, राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. त्यांची व्यक्तिश: माफी एकवेळ मागेन. परंतु भाजपच्या पाखंडी खासदारांची मुळीच माफी मागणार नाही असे अधीर रंजन चौधरी यांनी निक्षून सांगितले आहे. ‘सुंभ जळला तरीही पीळ काही सुटत नाही’ या म्हणीसारखीच काँग्रेसची अवस्था झाली आहे. जनमत प्रतिकूल असतानाही ही गुर्मी त्यांच्यात कुठून येते असा प्रश्न पडतो. विरोधकांना तुच्छ लेखण्याचे हे राजकारणच काँग्रेसला नडले आहे. अहंकाराची भाषा सोडून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले नाहीत तर काँग्रेसचे उरलेसुरले अस्तित्व देखील नष्टप्राय होईल हे वेगळे सांगायची गरज नाही.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply