कर्जत : बातमीदार
कर्जत शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णांसह शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या तीन झाली आहे. या शत्रूला थोपवण्यासाठी नगर परिषदेने पुन्हा कंबर कसली असून, या अंतर्गत आता शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम पालिका राबवणार आहे.
नॅशनल कमिशन फॉर वूमन, डीजीपी होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स आणि कर्जत नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी,मास्क वाटप आणि होमियोपॅथी औषधे यांचे शिबीर आयोजित केले जाणार आहे.या अंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची थर्मल स्कॅनींग करून त्यांना सर्दी,खोकला,ताप यासह काही आजार आहे का? याबाबत माहिती घेतली जाणार आहे. 26मेपासून शहरातील संजयनगर भागापासून याची सुरवात केली जाणार आहे. तीन दिवस शिबिर सुरू राहाणार आहे. बाहेर जाताना मास्क वापरा, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतर ठेवून संसर्ग टाळा. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा आजूबाजूला कोणी व्यक्ती बाहेरून आली असल्यास त्याची माहिती तत्काळ नगर परिषदेला कळवा, असे आवाहन करण्यात येत आहे.