देशाच्या जवळपास निम्म्या भागात पुढचे तीन ते पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात या महिन्यात तिसर्यांदा उष्णतेची लाट आली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मे महिन्याला सुरुवातही होण्याच्या आधी आलेली ही उष्णतेची लाट धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत असून हा जागतिक हवामानबदलाचा भाग असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय हवामानविषयक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात उष्णतेच्या तीव्र लाटा या 50 वर्षांतून एखाद्या वर्षी येत, तर आता हे प्रमाण दर चार-पाच वर्षांनी इतके खाली आले आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे मत जागतिक हवामानविषयक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. जोवर बेदरकार कार्बन उत्सर्जनाला तसेच इंधनांच्या वापराला अटकाव केला जात नाही तोवर उष्णतेच्या लाटांमध्ये भयावह वाढच होत राहील हे अलिकडच्या अनेक अहवालांमधून सांगितले गेले आहे. सध्या देशात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागतो आहे. येत्या चार-पाच दिवसांत राजधानी दिल्लीतील तापमान 46 अंशापर्यंत, तर राजस्थानातील तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदाचा मार्च महिना हा गेल्या 112 वर्षांतला सर्वाधिक उष्ण मार्च महिना होता. मार्च महिन्यातच इतक्या तीव्र उष्म्याचा सामना करावा लागल्याने देशातील गव्हाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली गव्हाची टंचाई लक्षात घेऊन यंदा आपण गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्याचे मनसुबे आखले होते, परंतु आता देशाची अंतर्गत गरज भागवून निर्यातीची ही उद्दिष्टे कशी गाठता येतील याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अतितीव्र उष्म्यामुळे मजूर व शेतकर्यांची अवस्था बिकट झाली असून देशातील वाढत्या विजेच्या मागणीला कसे तोंड द्यायचे हा प्रश्नही बिकट होऊ लागला आहे. विदर्भात आताच अकोला, ब्रह्मपुरी आदी भागांत तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. परभणीला 44 अंश, पुण्यात 43 अंश, तर मुंबईत 35 ते 39 अंशांच्या दरम्यान तापमान नोंदले जाते आहे. समुद्राजवळच्या भागातील कमाल तापमान 37 अंशांच्या वर गेले की त्यास उष्णतेची लाट आली असे संबोधले जाते. मैदानी भागामध्ये तापमान 40 अंशांच्या वर गेल्यास व डोंगराळ भागांत ते 30 अंशांच्या वर गेल्यास तो अतितीव्र उष्मा मानला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्याही भागातील तापमान हे सरासरीपेक्षा साडेचार ते साडेसहा अंशांनी वर गेल्यास तेथे उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तापमान त्याच्याही पुढे गेल्यास त्यास उष्णतेची तीव्र लाट संबोधले जाते. भारतातील उष्णतेची तीव्र लाट हा जगभरासाठी धोक्याचा इशारा मानला जातो आहे. जागतिक तापमानवाढीचे भविष्यातील गंभीर दुष्परिणाम सौम्य करण्यासाठी व लांबवण्यासाठी मानवजातीने काय करायला हवे याची चर्चा जागतिक हवामानबदलविषयक अहवालांतून गेली काही वर्षे सातत्याने होत राहिली आहे. आता जगभरातील सर्व देशांच्या सरकारांनी व आपल्यापैकी प्रत्येकाने ही चर्चा समजून घेण्याची वेळ आली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …