माणगाव : प्रतिनिधी – पोटाची खळगी भरण्यासाठी माणगाव तालुक्यातून राज्यातील जळगाव तसेच कर्नाटकमध्ये गेलेल्या 98 मजुरांना सर्व विकास दीप संस्थेने प्रशासनाच्या सहकार्याने सुखरूप घरी आणले आहे. याबद्दल या मजुरांनी आभार मानले.
माणगाव तालुक्यातील रातवड, वावेदिवाळी, निळज, चांदेवाडी, वाढवण, कोस्ते येथील आदिवासी बांधव कामाकरिता राज्यात व परराज्यामध्ये गेले होते. ते त्या ठिकाणी अडकून होते. त्यांचे ठेकेदार त्यांना उघड्यावर टाकून पळून गेल्याने 63 मजूर कर्नाटक राज्यात, तर 35 मजूर जळगावमधील यावल येथे अडकून होते. या सर्वांनी मूळ गावी ग्रामस्थांना फोन करून याबाबतची कल्पना दिली. सर्व विकास दीप संस्थेचे
संचालक रिची भाऊ यांना या प्रकाराची माहिती समजली.
संस्थेकडून कर्नाटकात अडकलेल्यांना फोन करून त्यांच्या नावाच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्याचबरोबर तेथील स्थानिक पत्ते मिळवले गेले. याद्या व पत्ते जिल्हा प्रशासनाला देऊन निवासी जिल्हाधिकारी बैनाडे तसेच आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या समन्वयक पाटेकर यांच्याशी चर्चा करून पत्ते व याद्या त्यांना देण्यात आल्या. अखेर सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून या 98 मजुरांना सुखरूप त्यांच्या मूळ गावी आणण्यात यश आले.
मूळ गावी आल्यानंतर स्थानिक प्रशासनामार्फत क्वारंटाइन नियमांचे पालन करून संस्थेच्या वतीने 98 मजुरांना धान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी स्थानिक कार्यकर्ते, रातवड ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश पवार, मंडल अधिकारी पालांडे, तलाठी वाघमारे, आशा सेविका, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी ताई, पोलीस पाटील उपस्थित होते. संस्थेचे कार्यकर्ते महेश मोरे यांनी धान्य वाटपाचे नियोजन व सोशल डिस्टन्सिंचेे पालन करून कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.