उरण ः प्रतिनिधी – जेएनपीटी येथील पीयूबीसमोरच असलेल्या न्हावा-शेवा कस्टम हाऊस इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील केमिकल लॅबला मंगळवारी (दि. 26) दुपारी आग लागली. जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा कळेल, अशी माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्ही. आर. दामगुडे यांनी दिली.
आग लागल्याचे कळताच पोलीस आणि जेएनपीटी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे केमिकल लॅबोरेटरीला आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दामगुडे यांनी माहिती देताना व्यक्त केला आहे.