मोहोपाडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी येथील तीन, दुर्गामाता कॉलनी दोन, तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रसायनीत एकूण सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी शिवनगरवाडी परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे, तर या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊन काळातीत दोन महिने रसायनीकरांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले, परंतु दोन महिन्यांनंतर कोरोनाने रसायनीत शिरकाव करून रहिवाशांना भयभीत केले आहे. शिवनगरवाडीत राहणारा 38 वर्षींय व्यक्ती घाटकोपरला काही दिवस आपल्या बाइकवरून कामाला जात होता. त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने आपली कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याने लोहोप आरोग्य केंद्र गाठून पुढे त्याला उपचारासाठी इंडिया बुल्समध्ये दाखल करण्यात आले. त्याची पत्नी व लहान मुलीचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही इंडिया बुल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर त्यांच्या लहान मुलाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील तरुण चेंबूर येथे नोकरीला जात असल्याने त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचाच मित्र वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नवीन वसाहत रिस, दुर्गामाता कॉलनी परिसरातील एक तरुण हाही चेंबूर नवी मुंबईत कामाला जात असल्याने त्याचा व त्याच्या पत्नीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मंडळ अधिकारी नितीन परदेशी
यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारपर्यंत रसायनीत सहा व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.