चिरनेर : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या गावातील अंतर्गत नाल्याची साफसफाई, डागडूजी व देखरेखीचे काम बरेच दिवस सुरू असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गी लागले आहे.
चिरनेर मुळपाडा येथील रहाठ विहिर ते माजी सरपंच संध्या मुंबईकर यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या नाल्याची साफसफाई व काही ठिकाणची डागडूजी व बंधारा घालण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. तर याच नाल्याच्या मार्गावरून मुळपाडा गावात नागरिकांना जाण्यासाठी साकाव पूलही उभारण्यात आला आहे. तर याच नाल्याला सलग जोडून असलेल्या नाल्याची साफसफाई करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. हे काम प्रतीक गोंधळी यांच्या निवासस्थानापासुन ते पूजा हॉटेलपर्यंत करण्यात आले असून, नाल्याची साफसफाई जेसीबीच्या सहाय्याने केली असून, आता पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग अगदी सुकर
झाला आहे.
या कामासाठी उरण पंचायत समिती व चिरनेर ग्रामपंचायतीमार्फत शेष फंड प्राप्त झाला असून, या निधीतून नाल्याचे काम करण्यात आले. सदस्या शितल घबाडी, सचिन घबाडी, सदस्या संध्या ठाकूर, जगदीश ठाकूर, अमित मुंबईकर यांच्या देखरेखेखाली काम पार पडले. या कामासाठी उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील यांच्या कंपनी मार्फत यंत्रसामग्री पुरविण्यात आली होती. यासाठी जि. प. चे सदस्य बाजीराव परदेशी व पंचायत समिती सदस्य शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर व ग्रामपंचायत सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.